पंढरपूर आषाढीवारी सेवा २०२२

तब्बल दोन वर्षानंतर श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारी होणार असल्याने या वर्षी येथे खूप मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. “आषाढी एकादशी” निमित्त, पोलिसांच्या विनंतीनुसार ‘अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ च्या (AADM) सदस्यांनी पोलीस उप-अधिक्षक श्री. विक्रम कदम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण पवार यांची पंढरपूर पोलीस स्टेशन येथे जाऊन भेट घेतली व त्यांना AADMच्या गर्दी व्यवस्थापन सेवेची माहिती दिली. या बैठकीदरम्यान, श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल मंदिर येथे 9 आणि 10 जुलै 2022 रोजी होणार्‍या “पंढरपूर आषाढी वारी” सेवेसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सुमारे १२०० डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटीयर्स ची (DMV) व्यवस्था करण्याची विनंती AADM कडे केली.

त्यानुसार श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त शनिवार, दि. ०९.०७.२०२२ दुपारी ३.०० वाजल्यापासून रविवार, दि. १०.०७.२०२२ रोजी सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत तीन शिफ्टमध्ये अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे क्राउड मॅनेजमेंटची सेवा करण्याबाबत ठरवण्यात आले.
३९ बसमधून प्रवास करून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून साधारण १२०० एएडीएम चे कार्यकर्ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सेवेसाठी पोहचले. अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटने “सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, कोर्टी” या कॉलेजचे हॉस्टेल व वर्ग येथे कार्यकर्त्यांच्या (DMVs) राहण्याची, जेवण्या-खाण्या-पिण्याचीही व्यवस्था केली. या ठिकाणावरून श्रीक्षेत्र पंढरपूर विठ्ठल मंदिरपर्यंतचे अंतर साधारण १२ किमी होते आणि कार्यकर्त्यांची बसने ने-आण करण्यासाठी सोयही संस्थेने केली होती.
शनिवार, दि. ०९.०७.२०२२ दुपारी ३ .०० वाजल्यापासून रविवार, दि. १०.०७.२०२२ रोजी सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत तीन शिफ्टमध्ये अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या डिएमव्हीजनी, वारकरी भक्तांच्या उसळलेल्या गर्दीला पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रण करण्याची सेवा केली. तसेच पंढरपूर विठ्ठलमंदिरात आपल्या लाडक्या विठुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकरी भक्तांचे मंदिर परिसरात आगमन आणि निर्गमन सुलभ करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना मदत केली.
अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या कार्यकर्त्यांनी काही वारकरी भक्तांना गरजेनुसार प्रथमोपचार दिला, तर काही जणांना उचलून जवळपास असलेल्या सरकारी दवाखान्यात ही पोहोचवले. तसेच पोलिसांनादेखील लागेल तसे प्रथमोपचार दिले.  
अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या एकूण १९ डॉक्टर व पॅरामेडिकल टीमने देखील ह्या सेवेत सहभाग घेतला.
तसेच हॅम रेडिओ (Amateur Radio) चे ट्रेनिंग व लायसन्स धारक असणाऱ्या ५५ ए ए डी एम च्या कार्यकर्त्यांनी HAM रेडिओ चे व्ही एच एफ़ (VHF) व यु एच एफ़ (UHF – Handheld Ham Radio) सेट वापरून संपर्क आणि समन्वयामध्ये मदत केली.
श्री. ईश्वर साबळे, पोलीस अधीक्षक, वायरलेस विभाग, पश्चिम महाराष्ट्र यांनी देखील एएडीएमच्या आरकॅड (ARCAD) क्लब च्या हॅम रेडिओ नियंत्रण कक्षाला भेट दिली व या सेवेचेही कौतुक केले.
ह्या वेळी ए ए डी एम च्या ४० स्त्री कार्यकर्त्यांनीही सेवेमध्ये सहभाग घेतला. हॉस्टेलमध्ये सर्व कार्यकर्त्यांची जेवण्याची व्यवस्था व सेवेला असलेल्या कार्यकर्त्यांसाठी पाण्याची बाटली व बरोबर अल्पोपहार असे पॅकेज बांधून देण्याची सेवा ह्या सर्व वीरांनी केली. तसेच, आलेल्या DMVs  च्या सामानाच्या संरक्षणासाठी क्लोकरूम ची सेवा देखील केली.

गेले दोन वर्ष वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेले होते, व ह्या वर्षी वारकऱ्यांची त्यांच्या माऊलीला भेटायची ओढदेखील पूर्ण झाली. त्यांची भक्ती अनुभवून व त्यांची आर्तता बघून आपले ए ए डी एम चे डीएमव्हीज् देखील सावळ्या विठ्ठलाच्या भक्तीत व ए ए डी एम च्या सेवेत पूर्णपणे रममाण झाले.